Dhondi - Champya is in a hurry! The new poster of 'Dhondi Champya Ek Prem Katha' is out

धोंडी – चंप्याला लागली लगीनघाई ! ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’चे नवीन पोस्टर झळकले

‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून लवकरच प्रेक्षकांना धोंडी आणि चंप्याची रोमॅंटिक लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. या दोघांचे प्रेम खुलत असतानाच त्यात आदित्य आणि ओवीच्या प्रेमालाही बहर येणार आहे.

मात्र त्यांच्या प्रेमाच्या आड येणार आहेत अंकुश आणि उमाजी. म्हणजे या प्रेमकहाणीमध्ये भलताच ट्विस्ट येणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षाअखेर प्रेक्षकांना भन्नाट, विनोदी काहीतरी पाहायला मिळणार. नुकतेच या चित्रपटाचे नवीन पोस्टर समोर आले आहे. पोस्टरवरूनच यात काय  धमाल होणार आहे, याचा अंदाज प्रेक्षकांना आला असेलच. ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, निखिल चव्हाण, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर प्रभाकर भोगले यांच्या कथेला प्रेरित होऊन निर्मिती केलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत.

पोस्टरमध्ये लग्नाच्या वेशात सजलेले आदित्य -ओवी आणि धोंडी – चंप्या दिसत आहेत. या दोन्ही प्रेमीयुगुलांना लग्नाची घाई लागली असून अंकुश आणि उमाजी त्यांच्या प्रेमात व्यत्यय आणू पाहात आहेत. आता अंकुश आणि उमाजी यांचे प्रयत्न सफल होणार की आदित्य -ओवी आणि धोंडी – चंप्याचे प्रेम जिंकणार, याचे उत्तर १६ डिसेंबरला चित्रपटगृहात मिळणार आहे.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर म्हणतात, ” चित्रपटातील गाण्यांना आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आशा आहे, असेच प्रेम प्रेक्षक चित्रपटावरही करतील. हा एक धमाल कौटुंबिक चित्रपट आहे. धोंडी आणि चंप्याची एक आगळीवेगळी प्रेमकहाणी यात अनुभवयाला मिळणार आहे. यात प्रेमकहाणीला विनोदाचा तडका देण्यात आला आहे.”

रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित या चित्रपटाचे सुनील जैन, आदित्य जोशी, व्हेनिसा रॉय, आदित्य शास्त्री हे निर्माते असून अमित अवस्थी, सुशांत वेंगुर्लेकर हे  सहनिर्माते आहेत.