बॉलिवूडमधील प्रख्यात आणि यशस्वी दिग्दर्शक सूरज आर बडजात्या कोविडनंतर एक चांगला चित्रपट बनवण्याचा विचार करीत होते. कोरोना काळात सगळीकडे नैराश्याचे वातावरण होते. पण या काळातही मित्र मैत्रीला जागत होते आणि संकटातही मित्रांची मदत करीत होते. ते पाहून सूरज बडजात्या यांनी आशा, आनंद आणि आपल्या जीवनातील संकटांची विविध एव्हरेस्टसारखी शिखरे कशी पार करावी याबाबत काही तरी ठोस निर्माण करण्याचा विचार सुरु केला. अगदी मनाच्या गाभाऱ्यातून चित्रपट बनवण्याच्या विचारातूनच राजश्री प्रॉडक्शनच्या ‘उंचाई’ चित्रपटाचा जन्म झाला.
एक वेगळ्या गिर्यारोहण विषयावरील या चित्रपटाचा नायक म्हणून सूरज बडजात्या यांच्या डोळ्यासमोर सर्वप्रथम जे अभिनेता आले ते महानायक अमिताभ बच्चनच. अमिताभ यांनी जीवनात अनेक संकटांवर यशस्वीरित्या मात केली असल्याने ते खऱ्या अर्थाने धैर्याचे प्रतीक आहेत. “आपल्या सर्वांच्या आत आपला एक एव्हरेस्ट आहे, हा चित्रपटाचा विचार अमितजींना खूप आवडला. त्यांनी ज्या दिवशी चित्रपटासाठी होकार दिला तो दिवस माझ्यासाठी खूप आनंददायक होता,” असे सूरज बडजात्या यांनी सांगितले.
अमिताभनंतर चित्रपटात अनुपम खेर यांचा समावेश करण्यात आला. अनुपम खेर यांनी राजश्रीच्या ‘सारांश’मधून चार दशकांपूर्वी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. राजश्री हे माझे कुटुंब आहे असे मान्य करून अनुपम खेर म्हणतात, ‘’चित्रपटातील तिसऱ्या मित्राच्या भूमिकेसाठी बोमन इराणीला आणण्याचे काम मी हाती घेतले. खरे तर बोमन इराणी यांच्या अत्यंत जवळच्या मित्राचे निधन झाल्याने त्यांनी काही काळ चित्रपटापासून दूर राहाण्याचा निर्णय घेतला होता. जसा सूरज माझा मित्र आहे तसाच बोमनही माझा मित्र आहे. जर सूरजला चित्रपटात बोमन हवा असेल, तर तो त्याला मिळायलाच हवा. तसेच सूरज बडजात्यासोबतच्या इतक्या सुंदर चित्रपटाचा भाग होण्याची ही संधी बोमनने गमावू नये असे मला वाटत होते. आणि म्हणून मी बोमनशी चर्चा केली आणि एखाद्या चांगल्या मित्राप्रमाणे मी या दोघांना एकत्र आणले.” असेही अनुपम खेर यांनी सांगितले.
अशा प्रकारे नकळतपणे, ‘उंचाई’ चित्रपट हा खऱ्या आयुष्यातील कुटुंब, मैत्री आणि आशेचा किरण असलेला चित्रपट ठरला.
बोमन इराणी यांनी अत्यंत भावुकतेने सांगितले, “मला वाटते अनुपम हा एक उदार मनाचा अभिनेता आहे. त्याला माझ्यातील कलाकाराने राजश्रीचा हा अत्यंत सुंदर असा चित्रपट करावा असे वाटत होते. राजश्री आज माझ्यासाठी एक मंदिर आहे. मागे वळून पाहताना, मला वाटते की ‘उंचाई’ हा चित्रपट माझ्या दिवंगत मित्राला एक भावपूर्ण श्रद्धांजली आहे.”
‘उंचाई’ ही अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी, सारिका, नीना गुप्ता आणि परिणीती चोप्रा यांच्या नशिबाची आणि कठोर प्रयत्नांची कथा आहे. दिल्ली ते माउंट एव्हरेस्टच्या पायथ्याशी असलेल्या बेस कॅम्पपर्यंतचा हा ऑन-द-रोड चित्रपट आहे. गाणी चित्रपटाची लय आणि गती आणखी पुढे नेतात. तसेच पार्श्वभूमीवर वाजणारी गाणी रस्ते प्रवासादरम्यानचा मूड आणखी चांगला करतात. अशा प्रकारचा ऑन द रोड मूव्हीचा प्रकार सूरज बडजात्या यांनी प्रथमच हाताळला आहे. त्यांच्या चित्रपटातील विवाहसोहळे आणि विधींची जागा ज्येष्ठ नागरिक असलेल्या नायकांनी घेतली आहे. त्यांचे आयुष्य कारच्या प्रवासासोबत बदलते आणि माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर त्यांना त्यांचे उद्दिष्ट्य प्राप्त होते. ‘उंचाई’ची उबदारता प्रवासाच्या कडाक्याच्या थंड परिस्थितीला हरवते आणि त्यातच, दिग्दर्शक सूरज बडजात्या त्यांच्या जादूच्या कांडीने एव्हरेस्टचे शिखर समोर आणतात.
‘उंचाई’ हा २०२२ मधील सर्वात मोठ्या रिलीझपैकी एक चित्रपट आहे. दिग्गज अभिनेते, अनुभवी दिग्दर्शक, एक प्रतिष्ठित प्रॉडक्शन हाऊस आणि एक अशी कथा ज्याचा गाभा कुटुंब, मैत्री आणि आशा आहे असा हा सर्वांगसुदर चित्रपट आहे.
‘उंचाई’ हा राजश्रीचा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. ज्येष्ठ अभिनेत्यांसह समुद्रसपाटीपासून १७००० हून अधिक फूट उंचीवर चित्रित केलेल्या या चित्रपटाचे सूरज आर बडजात्या यांनी केले आहे. महावीर जैन फिल्म्स आणि बाउंडलेस मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ११.११.२२ रोजी ‘उंचाई’ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
