Utkarsh Wankhede became the king singer of 'Sur Nava Dhyas Nava' - Parv Song on Colors Marathi

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे कार्यक्रमाचा उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक!

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीमा पार करत सुमारे पाच हजार स्पर्धकांनी या मंचावरून आपलं सुरांचं नशीब आजमावण्याचं स्वप्न पाहिलं.

कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला. या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.

१६ स्पर्धकांबरोबर सुरु झालेल्या या प्रवासामध्ये स्पर्धकांना बरेच काही शिकायला मिळाले आणि याच स्पर्धकांमधून कार्यक्रमाच्या मंचाला मिळाले अंतिम सहा शिलेदार आरोही प्रभुदेसाई, उत्कर्ष वानखेडे, शुभम सातपुते, संज्योती जगदाळे, नवाब शेख आणि कल्याणी गायकवाड. या स्पर्धकांमध्ये रंगला सूर नवा ध्यास नवाचा महाअंतिम सोहळा.

महाअंतिम सोहळ्यामध्ये रंगली गाण्याची मैफल आणि रंगले संगीत युध्द विजेतेपद जिंकण्यासाठीचे. आणि या मधूनच महाराष्ट्राला मिळाला नवीन सूर. भारतीय चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय संगीतकार कल्याणजी – आनंदजी या जोडीतील आनंदजी यांच्या हस्ते सूर नवा ध्यास नवाच्या विजेत्याच नाव घोषित करण्यात आले. उत्कर्ष वानखेडे याने सूर नवा ध्यास नवाचा राजगायक होण्याचा मान पटकावला.

उत्कर्ष वानखेडेला कलर्स मराठीतर्फे दोन लाख रुपये, चंदूकाका सराफ अँड सन्स यांच्याकडून सुवर्ण कटयार मिळाली तसेच केसरी टूर्सतर्फे काश्मीर टूर आणि तोडकर संजीवनी कडून इलेक्ट्रिक स्कूटर. संज्योती जगदाळे ठरली पहिली उपविजेती तिला कलर्स मराठीकडून एक लाखाचा धनादेश, केसरीकडून केरला टूर, महाभृंगराज ऑइलकडून पंचवीस हजाराचा धनादेश, आरोही प्रभुदेसाई ठरली दुसरी उपविजेती तिला कलर्स मराठीकडून ७५ हजारांचा धनादेश, केसरीकडून हिमाचल टूर, महाभृंगराज ऑइलकडून पंचवीस हजाराचा धनादेश.