A sweet story of gentle love “Bhagy Dile Tu Mala” on Colors Marathi!

हळुवार प्रेमाची गोड गोष्ट “भाग्य दिले तू मला” कलर्स मराठीवर !

असं म्हणतात एखादी गोष्ट जर मुळाशी जोडलेली नसेल तर ती कशी बहरेल ? यावरूनच आपल्या घरातील मोठी माणसं आपल्याला सांगतं असतात आजच्या वेगवान आयुष्यात सगळ्याचाचं विसर पडला आहे, पण यामध्ये आपल्या संस्कृतीला, परंपरेला विसरून कसं चालेल ? आपल्याला कितीही नाविन्याची ओढ लागली तरीसुध्दा मुळाशी, परंपरेशी जोडून राहिलेली माणसंचं आपली स्वप्न पूर्ण करू शकतात.

परंतू, या बदलत्या काळामध्ये आकाशाला गवसणी घालण्याच्या महत्वाकांक्षे पोटी आपण विसरून जातो की, आधुनिक पोकळ झगमगाटापेक्षा सुसंस्कृत दीपोत्सवच प्रगल्भ असतो. संस्कृतीला आणि परंपरेला धरून रहाणार्‍या व्यक्तिला वेड ठरवणार्‍या या जगात जेव्हा एकीकडे स्वत:ची संस्कृती जपण्याचा ध्यास असणारी आणि परंपरेचा डोळस अभिमान बाळगणारी कावेरी तर दुसरीकडे नाविन्याची कास असणारा राजवर्धन जेव्हा एकेमकांना समोर येतात तेव्हा काय घडेल ? या दोघांमध्ये हळुवार प्रेम कसे फुलेल ? जाणून घेण्यासाठी बघा “भाग्य दिले तू मला” विराट एंटरटेनमेंट निर्मित ही मालिका सुरू होत आहे ४ एप्रिलपासून सोम ते शनि, रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर. प्रभावशाली संवादफेक आणि त्याला उत्कृष्ट अभिनय जोड असलेली महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री निवेदिता सराफ मालिकेमध्ये रत्नमाला ही व्यक्तीरेखा साकारणार असून त्यांच्यासोबत विवेक सांगळे, तन्वी मुंडले, जान्हवी किल्लेकर प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

गुहागर येथे लहानाची मोठी झालेली कावेरी भाग्यशाली असं म्हणायला हरकत नाही कारण सावत्र आईचा दुस्वास तिला कधीच सहन करावा लागला नाही. मुळातच सांस्कृतिक चालीरीती, निसर्ग, भाषा आणि आपली माणसं यांच्यावर जिवापाड प्रेम करणार्‍या आणि त्यांना अविभाज्य भाग मानणार्‍या कावेरीचे मन कधीच सिमेंट काँक्रीटच्या घरात लागलं नाही. तर, दुसरीकडे, परंपरा आणि संस्कृती यांना जळमटासारखं झटकून पुढे चालणारा, आताच्या भौतिक सुखांपुढे नाती, प्रेम यांना तुच्छ लेखणारा उद्दाम, मग्रूर, आणि मुळांशी न जोडलेला राजवर्धन म्हणजेच रत्नमाला यांचा मुलगा. ज्याचे म्हणणं आहे, मोठं व्हायचं असेल तर जमीन सोडावी लागते.

तसेच परंपरेची काच कधीच न सोडलेल्या, त्याचा अभिमान असलेल्या रत्नमाला ज्यांचे खूप मोठे प्रस्थ आहे, मोठ्या उद्योजिका आहेत… ज्यांचा विश्वास आहे जमिनीवर राहून देखील आकाशापर्यंत गवसणी घालता येते. रत्नमाला यांना त्यांचा उद्योगाचा डोलारा यशस्वीरित्या पुढे घेऊन जाण्यासाठी, राजवर्धनमध्ये बदल घडवून आणण्यासाठी त्यांच्यासारख्याच संस्कृतीला धरून चालणार्‍या मुलीच्या त्या शोधात आहेत. आणि याचदरम्यान त्यांची आणि कावेरीची भेट होते. आता, रत्नमाला यांच्या पुढाकाराने कसे राजवर्धन आणि कावेरी एकेमकांना भेटणार ? कसा असेल त्यांचा हा प्रवास ? कशी रंगणार कावेरी आणि राजवर्धनची हळुवार प्रेमाची गोड गोष्ट लवकरच कळेल.

यानिमित्ताने बोलताना व्यवसाय प्रमुख, कलर्स मराठी, (वायकॉम18) – अनिकेत जोशी म्हणाले, “कलर्स मराठी नव्या वर्षात प्रेक्षकांनसमोर साचेबध्द मालिकांव्यतिरिक्त वेगळ्या धाटणीच्या, आशयघन कथानक असलेले विषय घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. नुकतेच वाहिनीमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. वाहिनीच्या ब्रीद वाक्यापासून ते मालिकांच्या कथा, चॅनलचा लुक अँड फील या सगळ्यामध्ये प्रेक्षकांना एक विशेष बदल झाल्याचे दिसून येईल. नाविन्यतेबरोबरच प्रत्येक मालिका, मालिकेतील पात्र हे मराठी मनाशी आणि महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेले राहील याची आम्ही जबाबदारी घेऊ. “भाग्य दिले तू मला” ही मालिका या बदलाची सुरुवात असेल हे नक्की.”

मालिकेनिमित्त बोलताना प्रोग्रामिंग हेड, कलर्स मराठी, (वायकॉम18) – विराज राजे म्हणाले, “रंग मनाला भिडणारे या ब्रीद वाक्याला अनुसरून “भाग्य दिले तू मला” या मालिकेची तयारी कलर्स मराठीच्या संपूर्ण टीमने सुरू केली. आपल्या संस्कृतीचे, परंपरेचे आणि आयुष्यात असलेल्या महत्वाच्या नातेसंबधाचे भान हे प्रत्येक व्यक्तीने ठेवलेच पाहिजे. आजच्या पिढीमध्ये या बाबींची उणीव भासते. आपण एखादी उंची गाठताना त्यामागे असलेल्या महत्वाच्या गोष्टींना विसरून जातो. परंपरेमध्ये बांधलेले असूनही आपल्या माणसांना न दुखावता आपुलकीने कशी त्यांची मनं जिंकता येतात, कसे यशाच्या शिखरावर पोहचता येते हे या नव्या मालिकेतून आम्ही दाखविण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मालिकेमध्ये निवेदिता सराफ महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. प्रेक्षकांनी त्यांना बऱ्याच भूमिकांमध्ये पाहिले आहे, त्यांना भरभरून प्रेमं देखील दिले आहे. या मालिकेनिमित्त त्या पुन्हाएकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत त्यामुळे आशा आहे प्रेक्षक या वेळेसदेखील तसंच प्रेम देतील. एखाद्या पात्राशी सहज समरस होऊन ते पात्र जिंवतपणे सादर करण्याचे कौशल्य त्यांच्यामध्ये आहे. मालिकेतील पात्र आणि ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी आमची खात्री आहे.”

आपल्या अभिनयाने प्रत्येकाच्या मनामध्ये अबाधित स्थान निर्माण केलेल्या, ज्यांच्यावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात अश्या आपल्या लाडक्या निवेदिता सराफ या मालिकेविषयी बोलताना म्हणाल्या, “तीन पात्रांभोवती फिरणार्‍या या कथानकात “रत्नमाला” या पात्राचे ठाम असे स्वत:चे मत, विचार आहेत. खूपचं वेगळी भूमिका आहे आणि म्हणूनचं मी मालिका करण्याचा निर्णय घेतला. रत्नमालाने स्व:बळावर स्वत:चे विश्व निर्माण केले आहे. तिने इथवरची वाटचाल आपल्या परंपरा, संस्कृतीला घट्ट धरूनच केली आहे. परंतू याउलट राजवर्धन आहे. आणि इथेच दोन पिढींमधील विचारांमध्ये खटके उडत आहेत, एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहेच पण दोघेही आपल्यापल्या मतांवर ठाम आहेत. यासगळ्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट संसाराचा रथ दोन चाकांवर चालतो. आणि म्हणूनच रत्नमालाला अशी मुलगी घरात सून म्हणून हवी आहे जी तिचंच प्रतिबिंब आहे, जिच्या मदतीने ती आपल्या मुलाला सुधारू शकेल. कारण आज आपण प्रत्येक घरामध्ये हे होताना बघतो माझं यावर एकंच म्हणणं आहे जुन्या लोकांचा अनुभव घ्या आणि पुढे जा. पण आताच्या मुलांना हे पटत नाही. ही दोन पिढींमधील जी वैचारिक तफावत आहे ती या मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. मालिकेचे कथानक प्रेक्षकांना नक्कीच आपलंस वाटेल.”

मालिकेच्या निर्मात्या कश्मिरा पाठारे म्हणाल्या, “माझ्या विराट एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेतर्फे “भाग्य दिले तू मला” ही मालिका कलर्स मराठी वर घेऊन येत आहे . भाग्य दिले तू मला ही गुहागर सारख्या निसर्ग संपन्न ठिकाणी लहानाची मोठी झालेल्या कावेरी ची गोष्ट आहे. संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या कावेरी च्या आयुष्यात अशी काही वळण येतात की तिला तिच्या स्वप्नासाठी म्हणून शहरात येऊन एका अत्यंत आधुनिक विचारांच्या अशा राजवर्धन ला पुन्हा एकदा संस्कारांच्या मुळांशी आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यातून त्यांच्यात कसं प्रेम फुलत जातं याची अत्यंत हळुवार आणि गोड अशी ही प्रेमकथा आहे . मूळ संकल्पना कलर्स मराठी वहिनीची असून वैभव चींचाळकर आणि मनीष दळवी यांनी मालिका माध्यमासाठी ती फुलवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. कथा आणखी रंजक करण्यासाठी आणि प्रेक्षकांची तिला पसंती मिळावी या साठी कलर्स मराठीचे अनिकेत जोशी आणि विराज राजे यांचे सृजनात्मक मार्गदर्शन लाभलं आहे. अमोल पाटील या मालिकेची पटकथा करत असून चेतन सैदाने संवाद लिहित आहेत आणि सागर खेऊर यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. संस्कृती आणि परंपराच्या बाबतीत दोन टोकाचा विचार करणाऱ्या जीवांची ही हळुवार प्रेमकथा प्रेक्षकांना नक्की आवडेल असा मला विश्वास वाटतो.”

कावेरी आणि राजवर्धनच्या या गोष्टीमध्ये अनेक अनपेक्षित वळण येतील, कधी गैरसमज तर कधी प्रेमाची तर कधी भांडणाची वादळ येतील पण या सगळ्यांशी लढत देत यांच्या हळुवार प्रेमाची गोष्ट कशी पुढे जाईल ? कसं कावेरी आधुनिकतेवर विसंबून जगत आलेल्या, संस्कृतीशी नाळ तुटलेल्या राजवर्धनला कशी पुन्हा एकदा मातीशी जोडण्यात यशस्वी ठरेल ? या सगळ्या कठीण प्रसगांमध्ये रत्नमालाची कावेरीला खंबीरसाथ तर मिळेलच. कसा असेल त्यांचा हा प्रवास ? या प्रवासाचे आपण देखील साक्षीदार होऊया ! तेव्हा नक्की बघा हळुवार प्रेमाची गोड गोष्ट “भाग्य दिले तू मला” ४ एप्रिलपासून सोम ते शनि, रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.