‘सनी’च्या मित्रांच्या भूमिकेत दिसणार ‘हे’ अभिनेते

‘आई कुठे काय करते’ मधून घराघरांत पोहोचलेला अभिषेक देशमुख आणि सहकुटुंब सहपरिवार’ मधील अमेय बर्वे आता हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत! नुकतीच त्यांची व्यक्तिरेखा समोर आली असून यात ते ‘सनी’चे खास मित्र दाखवले आहेत आणि यात महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे ती युकेच्या पॉऊलोने.

मूळ चिपळूणचा असलेला संतोष म्हणजेच अभिषेक देशमुख इंग्लंडला शिकायला गेला असून तो ‘सनी’चा खूप जवळचा मित्र दिसत आहे. मैत्रीत सनीला मदत करणारा, त्याच्यावर जीव लावणारा असा हा मित्र सनीला प्रत्येक क्षणी मदत करत आहे. गोंधळलेल्या सनीला वेळोवेळी योग्य दिशा दाखवणाऱ्या संतोषची म्हणजेच अभिषेकची यात महत्वाची भूमिका आहे. तर अमेय ‘सनी’चा पारगावचा जिगरी मित्र असून मस्तीमध्ये त्याला साथ देणारा दिसत आहे. तर पॉऊलोही ‘सनी’च्या आयुष्यात धमाल आणणार असल्याचे दिसतेय. प्रोमोवरून यांची ही भन्नाट मैत्री चित्रपटात रंगत आणणार हे नक्की. या चित्रपटात ललित प्रभाकर, चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

इरावती कर्णिक लिखित हा चित्रपट १८ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित ‘सनी’ या चित्रपटाचे अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे निर्माते असून संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular